नमस्कार मित्रांनो,
आज पुष्कळ दिवसानंतर लिहायला घेतलंय. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा!
आज मला थोड्या वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. मी काही दिवसांपूर्वी अकोल्याला जातांना मला ऑफिस मध्ये उशीर झाल्यामुळे माझी ट्रेन सुटली. त्यामुळे मग मी बस ने जायचा विचार केला. मला रात्री वेळेवर तिकीट मिळेना. मग मी शिवाजीनगर बस स्थानकावर गेलो. तेंव्हा मला पुणे ते औरंगाबाद अशी 'शिवनेरी' बस मिळाली. फार बरे वाटले. कमीत कमी ६ तास तरी चांगली झोप होईल म्हणून थोडा खुश झालो. पुढे पहाटे औरंगाबाद ला उतरल्यावर परत पुणे-अकोला लाल डब्बा गाडी मिळाली. रात्रीच्या वेळेस औरंगाबादला ती बर्यापैकी खाली झाली होती व मला खिडकी शेजारी जागा मिळाली.
मग मी जेंव्हा विचार केला तेंव्हा वाटले की शिवनेरी बस औरंगाबाद-अकोला का नाही? का म्हणून शिवनेरी बसेस केवळ मुंबई व पुणे ह्या शहरांच्या आजूबाजूला चालतात? पुणे-अकोला-नागपूर असा प्रवास करणारे कितीतरी प्रवासी आहेत. त्यामुळेच पुणे-नागपूर अशा कितीतरी खाजगी बसेस रोज चालतात. सध्या स्थितीत मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक अशा ठिकाणी शिवनेरी बसेस आहेत. शिवाय ह्या सर्व मार्गांवर व पुणे-सातारा, पुणे-सांगली, पुणे-बारामती अशा विनावाहक, विना-थांबा, निमाराम (एशियाड) बसेस धावतात. मग मुंबई पुनेपासून सुरु होऊन, कोल्हापूर व जास्तीतजास्त औरंगाबाद पर्यंत महाराष्ट्र संपतो का? मग औरंगाबाद-अकोला, अकोला-नागपूर, अकोला-नांदेड, नागपूर-नांदेड अशा रस्त्यांवर शिवनेरी बसेस का नाहीत? कमीत कमी पुणे, औरंगाबाद मध्ये विदर्भातील लोकांची संख्या पाहता व त्यांची आर्थिक स्थिती बघता अशा बसेस चालवणे पुणे-औरंगाबाद किंवा पुणे-कोल्हापूर पेक्षा नक्कीच कमी प्रवासी असणार नाहीत. बरं ह्या मार्गांवर विनावाहक-विनाथांबा निमआरम बसेस चालविण्यात काहीच हरकत नसावी.
ह्याचे कारण विचार करता करता अकोल्याला कधी पोहोचलो हे कळले नाही व मी उतरलो.
पण काही गोष्टी प्रकर्षाने वाटल्या त्या इथे नमूद करावाश्या वाटतात:
१. आपण महाराष्ट्र हे एक राज्य म्हणून व कुठ्यालाही भागांमध्ये भेदभाव न करता कधी वागणार? कधी पर्यंत आपण स्वतःच आपल्या महाराष्ट्राचे कोंकण, मराठवाडा, विदर्भ अशे तुकडे पाडत राहणार?
२. एखादी चांगली योजना असेल तर ती महाराष्ट्राच्या सर्व भागात लावावी जेणेकरून सर्व भागांत त्याची फळे मिळतील.
३. पुणे-औरंगाबाद, औरंगाबाद-अकोला, अकोला-नागपूर हे सर्व मार्ग प्रत्येकी ५/६ तासांचे आहेत, त्यामुळे अशा तीन भागांत शिवनेरी बसेस चालविणे एकदम योग्य होईल.
४. मराठवाडा, विदर्भातील लोकांची पुण्यात संख्या पाहता ह्या सगळ्या बसेस चांगल्या भरून वाहतील अशी खात्री वाटते.
५. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकावरून दुसर्या टोकाला जाण्यासाठी शिवनेरी बसेस चा पर्याय उपलब्ध होईल. कोल्हापूर ते नागपूर, कोल्हापूर ते मुंबई (हे आधीच आहे), मुंबई ते नागपूर हे सर्व कोपरे चांगल्या दर्जाच्या सरकारी बसेस ने कनेक्ट होतील.
६. शिवाय औरंगाबाद-अकोला, अकोला-नागपूर, नागपूर-नांदेड, अकोला-नांदेड, अमरावती-चंद्रपूर, सोलापूर-लातूर कोल्हापूर-रत्नागिरी, अशा मार्गांवर विनावाहक-विनाथांबा निम आराम बसेस चालवाव्यात.
७. ह्यासाठी विदर्भ, मराठवाडा, कोंकण अशा सर्व भागाच्या लोकप्रतिनिधींनी मागणी करावी. आपण सामान्य लोकांनी सुद्धा ह्यासाठी आपला आवाज उठविला पाहिजे.
८. मुंबई वरून बाहेरच्या राज्यांत अशा बसेस सुरु करण्याआधी आपल्या राज्यात सर्व भाग ह्याने जोडायला पाहिजे अशी माफक अपेक्षा सरकार कडून होती.
मला स्वतःला विदर्भ, मराठवाडा, कोंकण अशी विभागणी करणे आवडत नाही, पण कधी कधी आपल्या सभोवतालची परिस्थिती पाहून तुलना करायची इच्छा राहवत नाही. ह्यासाठी आता आपण लोकांनीच आपल्या मागण्या जोरदार लावून धरल्या पाहिजेत.
ह्याबाबत तुम्हाला काही बोलायचे असल्यास जरूर प्रतिक्रिया द्या.
राम राम,
अकोलकर
Later Shivneri was started on Pune-Aurangabad-Akola-Amravati-Nagpur stretch. I travelled on it twice and it seemed comfortable. Thanks to MSRTC for starting it.
उत्तर द्याहटवा