मुख्य सामग्रीवर वगळा

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो,
मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले.
अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे.
थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात.

१. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भिक्ष आहे.

२. ह्या संपूर्ण भागात पाउस अतिशय कमी पडतो व उन्हाळा खूप कडक असतो. (असे म्हणतात कि अकोल्याला जेवढे जास्त उन पडेल , तेवढा जास्त पाउस प. महाराष्ट्रात पडतो.) त्यामुळे हा संपूर्ण भाग अतिशय शुष्क व कोरडा आहे.

३. कोणी सिंचनासाठी जमिनीतून (विहिरीतून ) पाणी काढलेच तरीही हे पाणी खारे असल्यामुळे शेतीला देऊ शकत नाही. दिलेच तर १-२ वर्षांत पाण्यातील क्षार जमिनीच्या वरच्या थरात साठून जमीन शेती अयोग्य बनते. त्यामुळे येथील संपूर्ण शेती कोरडवाहू आहे.

४. खूप वेळेला जेंव्हा उन्हाळ्यात नदीचे पाणी आटते, लोकांना जमिनीतील पाणी पिण्यावाचून पर्याय राहत नाही. गरीब गावकरी, शेतकरी लोक हेच खारट पाणी पितात. हे खारे पाणी प्यायल्यामुळे लोकांना काही वर्षांतच मूत्रपिंडाचे आजार जडतात.   येथील अकोट, तेल्हारा, बाळापुर, संग्रामपूर, शेगाव व जळगाव-जामोद  ह्या तालुक्यांत जवळपास प्रत्येक खेड्यात तुम्हाला ८-१० लोक मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त दिसतील. व २०-२५ लोक मागील २ वर्षांत मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले आहे असे कळेल.

५. सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे व पाउस कमी असल्यामुळे ह्या भागातील शेतकरी आधीच गरीब असतात. शिवाय त्यांना मूत्रपिंडाचे आजार जडल्यामुळे त्यांच्या दुख्खाला पारावर राहत नाही. हे गरीब लोक डायल्यासीस  साठी कुठे जाऊ शकत नाहीत. ह्या भागात अकोल्याशिवाय कुठेच डायल्यासीस ची सोय उपलब्ध नाही व तेही खूपच महाग असते. येथील शासकीय रुग्णालयात डायल्यासीस ची सोय उपलब्ध नाही.
परिणामी अशा गरीब लोकांना उपचाराभावी मरणाला कवटाळन्याशिवाय दुसरा मार्ग नसतो.

शिवाय हा भाग शासनाकडून खूप दुर्लक्षित आहे. ह्या भागाला मोठे राजकीय नेतृत्व नसल्यामुळे देखील ह्या भागातील समस्या समोर येत नाहीत. व ह्या भागातील कोणता ना कोणता शेतकरी रोज मृत्यूला जवळ करतो.
ह्या बाबतीत काय करता येईल ह्याचा आढावा घेऊ.

१. ह्या भागाच्या समस्यांवर संशोधन करून त्या योग्य रीतीने सोडविण्यासाठी मोठी यंत्रणा लागेल. त्यासाठी अकोला इथे 'खारपान पट्टा विकास महामंडळ ' (Saline Track Development Corporation) स्थापन करण्यात यावे. ही ह्या भागातील लोकांची खूप जुनी मागणी आहे.
ह्या महामंडळाच्या माध्यमातून पुढील उपाय योजना करता येतील.

२. सर्वांत आधी ह्या भागातील प्रत्येक खेड्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. जल शुद्धीकरण यंत्रणा लावून लोकांना गोड पाणी प्यायला दिले पाहिजे. तसे झाले तर मूत्रपिंडाचे आजार कमी होतील.

३. त्यासाठी इथे बाजूच्या भागातीली मोठ्या धरणांवरून पाणी आणले पाहिजे जसे अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्प किंवा हिंगोली जिल्ह्यातील येलदरी प्रकल्प!

४. तसेच इथे गरीब शेतकऱ्यांना झालेल्या मूत्रपिंडाच्या आजारावर मोफत / माफक दारात उपचार केले पाहिजेत. त्यासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात (वैद्यकीय महाविद्यालयात) सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या फिजेत. जसे डायल्यासीस यंत्र. तसेच हे सर्व उपचार इतर ठिकाणच्या आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत - मुर्तीजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापुर, संग्रामपूर, जळगाव-जामोद, शेगाव इ. ठिकाणच्या  तालुका केंद्रांवर. 

५. खारपान पट्टा महामंडळाच्या माध्यमातून ह्या भागात शेती सिंचन कसे करता येईल हे तपासले पाहिजे. उदा. शेततळी, पाण्याचा उपसा इ. तसेच झालेल्या कामाची प्रगती योग्य रीतीने तपासून त्यामुळे किती फायदा झाला हे खातरजमा केले पाहिजे.

६. 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला'  मध्ये खारपान पट्ट्यातील सिंचनाच्या समस्यांवर संशोधन करून चांगले उपाय शोधण्यासाठी प्रोजेक्ट मंजूर केला पाहिजे. त्याबाबतीतचा प्रस्ताव विद्यापीठाने सरकारकडे आधीच पाठविला आहे. 

७. ह्या उपयान्मधून सिंचन करणे योग्य असल्यास त्यासाठी योग्य ते भांडवल समन्धित यात्रानांना उपलब्ध करून दिले पाहिजे.

ह्या सर्व सर्व कामान्ना वेळ लागेल. पण हे सर्व केले तरच हा शेतकरी थोडा सुखी होऊन आत्महत्येच्या पशापासून दूर जाईल. 

तेंव्हा हे सर्व करण्यास देव सरकारला बुद्धी देवो, व हे सगळे मागण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींना हिम्मत देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! 

टीप: ह्या समस्येवर खूप वर्तमान पत्रांत लेख लिहून आले आहेत. तसाच हा एक लेख indianexpress मध्ये आला होता. त्याची लिंक इथे देत आहे. 


आभार,
होबासराव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार, आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा! मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते! पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण...

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...