मुख्य सामग्रीवर वगळा

|| शेगाव व वर्हाडातील इतर देवस्थाने ||

मित्रांनो नमस्कार,

आज जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येकाला शेगावीचे श्री. गजानन महाराज माहित असतील. अक्खा महाराष्ट्र श्री संत गजानन महाराजांना पुजतो व त्यांचे आशीर्वाद मागतो. महाराष्ट्र ही सदैव संतांची भूमी राहिली आहे. तरीही काही संत देवस्थानाशी पोहोचले व देवच होऊनी गेले. त्यांना श्री भगवंताचे रूप मानले गेले. जसे अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री. साईबाबा, आळंदीचे श्री. ज्ञानेश्वर माउली, देहूचे श्री. संत तुकाराम महाराज. तसेच शेगावीचे श्री.  संत गजानन बाबा!


मी जेंव्हा जेंव्हा शेगावला जातो, तेंव्हा तेंव्हा मला संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेले भक्त दिसतात. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून (कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी सारख्या ठिकाणांवरून ) इथे दर्शनासाठी आलेले भक्तगण पाहता अचंबा वाटतो... व शेगाव म्हणजे प्रती पंढरपुरच असे जाणवते!
पण आपण संस्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याचे कारण कळून चुकते. आत प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण वातावरण भक्तीसागरात डुबलेले ! संपूर्ण स्वच्छता!! कुठे धावपळ नाही कि गोंधळ नाही. प्रत्येक भक्त दर्शनाच्या ओढीने आतील मंदिराकडे जात असतो. खूप गर्दी असल्यास (जी खूप वेळा असते) द्वारापासूनच रांग लागलेली असते. पण कुठेच गोंधळ नाही. प्रत्येक जन ' श्री संत गजानन महाराज कि जय' चा राग आवळून रांगेत पुढे जात असतो. ठिकठिकाणी स्वयंसेवक हाती खराटा घेऊन परिसर स्वच्छ करीत असतात. काही स्वयंसेवक रांगेतील भक्तांना सूचना करण्यासाठी फिरत असतात.
मुख्य म्हणजे इथे एवढी गर्दी असून सुद्धा सर्वांना समानतेने रांगेतच राहून दर्शन घ्यावे लागते. ही गोष्ट मला खूप भावते. इथे तीरुपातीसारखे पैसे देऊन जलद रांगेत जाता येत नाही. अगदीच म्हणायचे झाले तर वृद्ध भाविकांसाठी किंवा घाईत असणार्यांसाठी एक दुसरी रांग आहे ज्यामधून महाराजांचे दर्शन होईल पण ती सर्वांसाठी खुली आहे. त्याला प्रवेश फी नाही. त्यातून महाराजांच्या मूर्तीच्या जवळ जाता येत नाही.
शिवाय इथे बडव्यांचा त्रास नाही. कुणी जबरदस्तीने देणगीची मागणी करीत नाही. सर्व भक्तांची मर्जी.
दर्शन झाल्यावर इथे पोळी-भाजी, लाडूचा प्रसाद दुपारपर्यंत मिळतो. त्यासाठी भक्त लगबग करीत असतात. इथे असतांना आपल्याला संस्थानाच्या प्रामाणीकपणाचा प्रत्यय लहान लहान गोष्टीत येतो. अभिषेकाची रक्कम दिल्यावर भक्तांना दुपट्टा/धोतर/टोपी/साडी अशी भेट मिळते. शिवाय इथले संस्थान समाजासाठी सुद्धा खूप उपक्रम राबवते. अलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपथि दवाखाने चालवते. आदिवासी मुलांसाठी शाळा चालवते. इंजिनीरिंग कोलेज आहे, आश्रमशाळा आहेत. भक्तांच्या सोयीसाठी अतिशय स्वस्त असे भक्त-निवास आहेत व (ते उत्तम स्थितीत आहेत). भक्तांच्या मनोरानासाठी आता नवीन आनंदसागर बाग निर्मिली आहे. ती अतिशय सुंदर असून अमेरिका किंवा युरापात असलेल्या बागेसारख्या वाटते.
प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी दर्शनासाठी नक्की यावे असे हे संस्थान आहे. त्यांच्यासाठी इथे थोडी माहिती देतो आहे:


************************************************************************************

१. साधारण कार्यक्रम:
-> सहसा तुम्ही सकाळी पोहोचल्यास तुम्हाला १-२ तासामध्ये सकाळी दर्शन मिळेल (विशेष दिन - जसे प्रकटदिन व रामनवमी असल्यास गर्दीमुळे हा वेळ ६-७ तासांपर्यंत वाढू शकतो).  त्यानंतर तुम्ही मंदिराचा इतर भाग, उप- मंदिरे बघू शकता, व अभिषेकाचा कार्यक्रम उरकू शकता. नंतर तुम्हाला सकाळी ११ च्या सुमारास प्रसाद घेऊ शकता.
त्यानंतर तुम्ही संस्थानाच्या बसने वा  रिक्षाने आनाद्सागर इथे जाऊन इथे असलेल्या बागेमध्ये फिरू शकता. इथे बागेत २-३ तास तुम्ही सहज राहू शकता. शिवाय तुमच्या पोट पुजेची सर्व सोय उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------

२. कसे जावे?
-> शेगाव हे मध्य रेल्वे च्या मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर आहे. तुम्ही मुंबई, पुणे, कोल्हापूर वरून शेगावला उतरू शकता. काही ट्रेन्स इथे थांबत नाहीत, त्यासाठी सर्वात जवळचा रेल्वे थांबा म्हणजे अकोला जं. अकोल्याला ह्या मार्गावरील सर्व ट्रेन्स थांबतात. अकोला-शेगाव हा प्रवास रस्त्याने १ तासाचा व रेल्वे ने ४५ मिनिटांचा आहे. तसेच तुम्हाला अकोल्यावरून परतीचा प्रवास सोयीचा होईल.
नागपूर बाजूने येणाऱ्या भक्तांसाठी रेल्वेचा हाच मार्ग होय. बसने वा खाजगी गाडीने येणार असल्यास तुम्हाल अकोल्यावरून जावे लागेल. तुम्ही नागपूर ते अकोला हे राष्ट्रीय महामार्ग ६ ने येऊ शकता.
नांदेड, परभणी बाजूने येणार असल्यास पूर्ण-अकोला रेल्वे मार्गे किंवा रस्त्याने वाशीममार्गे अकोल्याला उतरावे लागेल.
तुम्ही अकोल्याला उतरून इथून खाजगी गाडी सुद्धा करू शकता.
-----------------------------------------------------------


३. कुठे राहावे / वास्तव्य:
-> शेगावला राहायचे असल्यास संस्थानच्या भक्तनिवासात राहणे उत्तम. इतर ठिकाणी राहणे टाळलयास बरे. संस्थानाच्या भाक्तीनिवासात प्री-बुकिंग होत नाही. प्रथम येणार्यास प्राधान्य असते. त्यामुळे मोठ्या टोळीने येणार असल्यास अकोला येथे उत्तम. भक्त निवास व अकोल्यातील हॉटेल्स चे दूरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे:

शेगाव संस्थान
भक्त निवास १&२                    :07279-252018 / 252251/ 253376
भक्त निवास (हत्तीखाना) 3&4  :07279-252154
भक्त निवास ५ (डिलक्स)        :07279-252699

अकोला
1. जास्नाग्रा हॉटेल           : 0724 -439471-2-3-५

2. हॉटेल ग्रीनलंड             : 0724 - 2459981/82/84, 9823190101, 9823051993

3. हॉटेल रायझिंग सन    :  0724 - 2432931, 2423932, 2443436
4. हॉटेल स्कायलार्क        :  0724 - 2438151, 2437544

-----------------------------------------------------------

४. कधी जावे:
-> तसे इथे १२ महिने भक्तांची गर्दी असते. पण भटकंती व हवाबदल हा सुद्धा तुमचा एक अजेंडा असल्यास हिवाळ्यात जाणे उत्तम. उन्हाळ्यात इथे तापमान खूप वाढते.
-----------------------------------------------------------

५. जवळपासची ठिकाणे :
-> तुमचा ४-५ दिवसांचा प्लान असल्यास तुम्ही अकोल्यावरून खालील ठिकाणे फिरू शकता.

अ. राज-राजेश्वर - अकोल्यातील राजराजेश्वर हे शंकराचे देवस्थान असून अकोल्याचे दैवत आहे. वऱ्हाडात हे महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे.  अकोल्यात थांबले असल्यास १-१.५ तासामध्ये राज्राजेश्वाराचे दर्शन घेऊन येईल. श्रावण महिना असल्यास मात्र गर्दी असते.

 ब. माहूर - दुरून येणाऱ्या भाविकांसाठी ज्यांचे ह्या भागात सहसा येणे होत नाही, अशांसाठी शेगाव्सोबत माहूरच्या देवीचे दर्शन करणे योग्य होईल
       अकोला-मंगरूळपीर-दिग्रस-माहूर हे अंतर १७० किमी आहे.
       अकोला-कारंजा-दारव्हा-माहूर हे अंतर १९० किमी आहे.

 क. कारंजा - कारंजा हे जैन लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच दत्ताचे एक प्रमुख देवस्थान आहे. अकोला-  कारंजा हे अंतर ७५ किमी आहे व चांगल्या रस्त्याने जोडले आहे.

 ड. शिरपूर जैन - शिरपूर जैन हे जैन लोकांचे प्रमुख देवस्थान आहे. येथील अंतरीक्ष जैन मंदिर  प्रसिद्ध आहे. अकोला-शिरपूर हे अंतर ६० किमी आहे. इथे मराठी जैन लोकांची वस्ती आढळते.

 ड. पातुर -  इथे रेणुका मातेचे टेकडीवर मंदिर असून ते प्रसिद्ध आहे. शिवाय हा परिसर नयनरम्य आहे.

 ट. औंढा-नागनाथ - औंढा नागनाथ हे १२ ज्योत्रीलींगापैकी एक असून हिंगोली जिल्ह्यात आहे. अकोला-वाशीम-औंढा नागनाथ हे अंतर १५० किमी आहे असून राज्य महामार्गाने जोडले आहे.

 ठ. धारगड, नरनाळा किल्ला - धारगडचे महादेवाचे मंदिर खूप प्रसिद्ध असून टेकडीवर आहे. इथे श्रावण महिन्यात मोठी जत्र भरते. इथे जिल्हा प्रशासनाने चांगली व्यवस्था केली आहे. शिवाय येथून तुम्हाला  ट्रेकिंगची हौस असेल तर नरनाळा किल्ला एक चांगला ट्रेक होऊ शकेल. शिवाय हा पण परिसर अतिशय नयनरम्य आहे. पण ट्रेकिंग साठी  तुम्हाला हिवाळ्यात वा पावसाळ्यात येणे चांगले.

माहूर - १ दिवस जाऊन येऊन पुरे
औंढा नागनाथ, पातुर, शिरपूर जैन - १ दिवस पुरे  
कारंजा, राजराजेश्वर  - १ दिवस पुरे
नरनाळा, धारगड - १ दिवस पुरे.

टीप:  वऱ्हाडात उन्हाळा व हिवाळा तीव्र असतात. तेंव्हा येतांना ह्याची खबरदारी घ्यावी.  उन्हाळ्यात तापमान ४० सेल्सिअस च्या आसपास जाते. तेंव्हा हिवाळा व पावसाळा हे ऋतू येण्यास चांगले.

************************************************************************************

चला तर मग, येतंय न गजानन महाराज व परिसराच्या दर्शनाला!


आभार,
अकोलकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !!

श्रावणातील अकोल्याचे राजराजेश्वर आणि कावड उत्सव !! नमस्कार मित्रहो! खूप दिवसांपासून मी ब्लोगवर आलो नाहीये. मागच्या एक महिन्यात कार्यालयात खूप काम असल्यामुळे वेळच नाही मिळाला. आज खूप दिवसांपासून ब्लोग लिहायची इच्छा पूर्ण करतोय. श्रावण महिना मला तसा खूपच आवडतो आणि मला खात्री आहे कि तुम्हा सर्वांना सुद्धा तो खूप आवडत असावा। पूर्वी   श्रावणातील दर सोमवारी अकोल्यातील श्रीराजराजेश्वर दर्शन करणे म्हणजे एक मुख्य काम असे।    आमचे आवडीचे... आणि आमचेच नाहीतर सर्व अकोलेकरांचे। श्रावणातील दर सोमवारी इथे एक   मोठा  उत्सवाच असतो। अकोलेकारांची भाविकता ह्यावेळेस प्रकर्षाने दिसून येते। पतेच 4-5 वाजतापासून अकोलेकर आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक पायी मंदिराकडे जाण्यास निघतात। 'जय श्री राजराजेश्वर', ' जय भोले', 'ओम नमः शिवाय', असे जप करतच भाविक वाट चालतात। सोबतच तरुणांचे कितीतरी गट खांद्यावर कवडी घेऊन पूर्णा आईचे पाणी घेऊन लगबगीने राजेश्वराक...

वर्हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण : खारपान पट्टा - एक चिंतन!

नमस्कार मित्रांनो, मला खूप दिवसांपासून ह्या गोष्टीवर लिहायची इच्छा होती, पण जमले नाही. शेवटी आज लिहायला घेतले. अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील बुलढाणा, अकोला व वाशीम हे कायम दुर्लक्षित जिल्हे असून येथील आत्महत्यांची संख्या खूप मोठी आहे. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर ह्याचे एक प्रमुख कारण समजते - ह्या भागातील खूप मोठ्या प्रदेशावर असलेला खारपान पट्टा! हा खारपान पट्टा काय आहे, हे आपण समजून घेऊयात. १. पूर्णा नदी जेंव्हा सातपुडाच्या पर्वत रंगांतून खाली पठारावर  येते, तेंव्हा नदीच्या काठावरील बहुतेक प्रदेश हा खारपान पट्ट्यात येतो. उदा. मुर्तीजापूर, अकोला, अकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, दर्यापूर,  संग्रामपूर, नांदुरा हे तालुके. ह्या भागातील जमीन ही क्षारयुक्त आहे. जमिनीतील पाणी अतिशय खारट (खारे) व क्षारयुक्त असते. हे पाणी जनावरे सुद्धा पिऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या भागात पिण्याच्या पाण्याचे खूप दुर्भि...