नमस्कार मित्रांनो,
आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलूयात. खूप दिवसांपासून माझ्या मनात हा विषय आहे. मी ह्याच्यावर विचार करतो आहे, पण काही उपाय मिळत नव्हता. मग लक्षात आले कि ह्याला एक असा काही उत्तर नाहीये. आहेत काही उपाय पण ते कोणतेही १००% उपयुक्त नाहीत... तर ते सर्व उपाय सोबत अमलात आणावे लागतील.
आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो - मराठी भाषेला कोणी वाली उरला नाही किंवा ती काही दिवसांत इतिहासजमा होणाच्या मार्गावर आहे. वगैरे वगैरे.. त्यावर काही लोक विरोध करतांना म्हणतात की आपल्या मराठी भाषा मारणार नाही तर ती वाढत जाईल.. फक्त शहरातले लोक इंग्रजी बोलतात पण संपूर्ण ग्रामीण भाग अजूनही मराठी बोलतो वगैरे वगैरे...
मला वाटत की ह्या दोन्ही गोष्टी काही अंशी चुकीच्या आहेत व काही अंशी बरोबर! मराठी भाषिकच कितीतरी लोक घोळक्यांत असतांना मराठी न बोलता इतर भाषा बोलतात, हे मी पहिले आहे. तसेच मराठी भाषेबरोबरच मराठी भाषिकांचा विकास करणे हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे.
आज आपण बघाल की बाहेर रस्त्याच्या कडेला किंवा कोलेज मध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर ५-१० लोक जमलेले असतील तर ते बहुतेक वेळेला मराठी बोलत नाहीत .. त्यातील ५ पैकी ४ माणसे मराठी असूनसुद्धा ! असे का व्हावे? काय चुकतय? इतर राज्यांत सुद्धा असेच होते का? .....
आपण जर ह्यावर विचार केला व थोडे बारकाईने निरीक्षण केले काही गोष्टी लक्षात येतात.
-> हिंदीचे अतिक्रमण - खूप ठिकाणच्या बैठकीत किंवा सभा-अधिवेशनांमध्ये ह्या विषयर बोलतांना लोक इंग्रजीला मराठीचा शत्रू संबोधतात. व असे भासवतात की केवळ इंग्रजी मुळेच मराठीला धोका आहे. खरे पहिले तर हिंदी हाच मराठीचा सर्वांत मोठा शत्रू आहे. इंग्रजी नाही! निदान सध्या तरी नाही! आपण ५-१० जणांच्या घोळक्यामध्ये बोलतांना मराठी ऐवजी हिंदी बोलतो. दुकानात दुकानदाराशी हिंदी बोलतो. फोनवर अनोळखी माणसाशी संवाद साधतांना प्रथम हिंदी ने सुरु करतो. ऑटो/रिक्षावाल्याशी प्रथम हिंदीत बोलतो.. का म्हणून?
कारण आपण मराठी लोक बहुतांशी पुढच्याचा जास्त विचार करतो. म्हणून जर दुकानदार हिंदी (किंवा कोणीही अमराठी ) असेल तर आपण त्याच्याशी त्याला समजावे म्हणून हिंदी बोलतो. आपण हे विसरतो की तो माणूस महाराष्ट्रात दुकानदरी करतो आहे, बहुतांशी गिऱ्हाईक मराठी आहेत व त्याला मराठी येणे आवश्यक आहे. ठीक आहे, तो हिंदी असेल तर एक वेळ समजू शकण्यासारखे आहे, पण तो तमिळ, तेलुगु, किंवा बंगाली असेल तरीही आपण हिंदी बोलतो. का? आपण बंगाली किंवा तमिळ बोलत नाही... तमिळ माणसाला जशी मराठी येत नाही तशीच हिंदीही येत नसते... पण मग हळूहळू तो मराठी न शिकता हिंदी शिकतो. त्याला कुठली तरी भाषा शिकावीच लागते पण आपण त्याला हिंदी चा पर्याय देतो... हीच चूक होते. आणि मग महाराष्ट्रात कुठेही हिंदी आली की आपल्याला कुठलीही अडचण नाही अशी भावना सर्वमान्य होते.
मी चेन्नई ला असतांना माझ्या काम्पिनिमध्ये काही तमिळ मुले होती. ती मला सांगत होती की ते जेंव्हा काही काळ पुण्यात असतांना त्यांना आधी खूप त्रास गेला.. पण मग त्यांनी हिंदी शिकली. आणि मला ते सांगू लागले की हिंदी भाषा खूप चांगली आहे व त्यांना ती खूप आवडली! मला आच्छर्यच वाटले. मग मी त्यांना म्हणालो की पुण्याची कुठली भाषा आहे? व त्यांनी सांगितले की हिंदी (बापरे!!). त्यांना १.५ महिने पुण्यात राहून सुद्धा पुण्याची मूळ भाषा मराठी आहे हे कळले नाही. व रे आपले दुर्भाग्य!!
-> ह्याचे मला आणखी एक कारण वाटते की आपला मराठीबाबतचा न्यूनगंड! कोणी कितीही नाही म्हंटले तरी हे एक प्रमुख कारण आहे. पुढचा माणूस हिंदी असला म्हणून आपण का म्हणून हिंदी बोलावे ? त्यांनी मराठी का शिकू नये? तो इथे मराठी न शिकता कसा काय व्यवसाय करू शकतो?
-> ह्याचे आणखी एक कारण म्हणजे हिंदी मेडिया (मनोरंजन व इतर माध्यमे ) ची मराठी लोकांवर असलेली जबरदस्त पकड! हे एक कारण खूप दुर्लक्षित राहिले आहे असे वाटते. कुठल्याही समाजाचे भविष्य हे त्यातील तरुण पिढीवर अवलंबून असते. तेच त्याला दिशा देत असतात. आणि मनोरंजाची माध्यमे तरुणायीवर सत्ता गाजवत असतात. हिंदी मनोरंजन माध्यमांनी आपल्या संपूर्ण तरुण पिढीवर साम्राज्य उभे केले आहे. तमिळ किंवा तेलुगु लोकांवर हिंदीचा प्रभाव नसण्याचे एक प्रमुख कारण तिथली स्थानिक तगडी माध्यमे / मिडिया. तमिळ माणसाला त्याचे संपूर्ण मनोरंजन तमिळ माध्यमे उपलब्ध करून देतात. त्यामुळे तिथला तरुण हिंदी कडे आकृष्ट होत नाही. मराठीचे तसे नाही. आपणाला लहानपणापासून हिंदी टेलीविजन व हिंदी चित्रपटांचे बाळकडू मिळते. अगदी घराघरांत हिंदी वाहिन्या व चित्रपट चालू असतात. त्यामुळे लहान मुले लगेच हिंदी आत्मसात करतात. शिवाय त्यातून दाखविल्या जाणाऱ्या उंची हिंदी/राजस्थानी/गुजराती राहणीमानाचा आपल्यावर दबाव पडतो. तसे पहिले तर राजस्तान, यु, पी, गुजरात, मध्य प्रदेश मधील सामान्य लोक आपल्यासारखेच असतात. पण ते पाहून आपल्याला आपल्या वरना पेक्षा दाल-तडका अधिक चवदार वाटतो... मराठीचा न्यूनगंड निर्माण होतो.
-> आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रात बहुतेक शहरांत हिंदी मारवाडी लोक हे खूप श्रीमंत असतात व मराठी त्यामानाने सर्वसाधारण अर्थार्जन करणारे. त्यामुळे साहजिकच मराठी लोकांवर हिंदी चा दबाव पडतो. हा प्रकार मुख्य करून संपूर्ण विदर्भ, थोड्या प्रमाणात मराठवाडा आणि संपूर्ण मुंबई मध्ये आहे. म्हणजे हिंदी लोकांनी श्रीमंत असणे चूक नाही, पण मराठी लोकांनी सुद्धा श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण - राजा तशी प्रजा! आणि आताच्या काळात पैसा हाच एक राजा आहे. राजा जर हिंदी भाषिक असेल तर प्रजा हळूहळू हिंदी शिकतेच.
-> देवनागरी लिपी - माझ्या मते आणखी एक कारण म्हणजे मराठी व हिंदी दोन्ही भाषांची असणारी देवनागरी लिपी. माझ्या ह्या मताशी काही जन सहमत होणार नाहीत पण मला मात्र असे प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे हिंदी लिहिणे किंवा वाचणे मराठी माणसाला सहज सध्या होते. तसेच खूप वेळेला हे हिंदीत लिहिले आहे की मराठीत हे लवकर काळात नाही, जोपर्यंत वेगळे असणारे मराठी/हिंदी शब्द येत नाहीत. तसे पहिले तर हेच कारण हिंदी लोकांना मराठी लवकर कळण्यासाठी उपयोगात येवू शकते... पण सोबत असणारी इतर कारणांमुळे मात्र नेमके उलटे घडते. ह्या कारणामुळे अमराठी माणसाला मराठी न समजून घेताही महाराष्ट्रात राहणे अवघड होत नाही व पर्यायाने तो मराठीही शिकत नाही.
-> आणखी एक कारण आहे ते म्हणजे मराठी माणसाची विविध बोलीभाषा सामावून घेण्याची तयारी नसणे. विदर्भाचा वर्हाडी बोलणारा मुलगा, मराठवाड्याचा किंवा सोलापूरचा वेगळ्याच हेल काढून बोलणारा मुलगा, किंवा कोंकणी ढंगाचा बोलणारा मुलगा, कोणाचीही खिल्ली उडवू नका. मला वाटते, खूप वेळा आपण थोडा वेगळा मराठी बोल्नार्याची टवाळी करतो व तो मुलगा हळू हळू मराठी पासून लांब जातो. त्याला बाहेर मराठी बोलण्यापेक्षा हिंदी बोलणे जास्त योग्य वाटते. हे मी अकोल्याला असतांना पहिले आहे. त्यामुळे मग ही मुले सरळ सरळ हिंदीच बोलतात. कारण मराठी बोलल्यास मुलांच्या सन्मानाला धक्का पोहोचतो.
ह्यासाठी आपल्याला हिंदी व इंग्रजी कडून शिकले पाहिजे. हिंदी किती ढांगानि बोलता येते - युपिची हिंदी वेगळी, राजस्थानची वेगळी, बिहारची वेगळी, दिल्लीची वेगळी, हिमाचलची वेगळी.. पण हिंदीने सर्व बोलीभाषांना सामावून घेतले आहे. आपण गोव्याच्या कोंकणीला सुद्धा सामावून घेऊ शकलो नाही.
तसेच इंग्रजी चे.. इंग्रजी बोलण्याचा अमेरिकेचा ढंग वेगळा, यु.के. चा वेगळा (त्यातही इंग्लंड आणि आयरिश लोकांचा वेगळा) , ऑस्ट्रेलियाचा, सौथ आफ्रिकेचा वेगळा इ. पण तरीही सर्व सामावून घेतले जाते. उलट इंग्रजीने फ्रेंच, ल्याटिन, जर्मन भाषेकडून एवाढेच नव्हे तर आपल्या हिंदी/मराठी कडूनही कितीतरी शब्द घेतले आहेत. म्हणूनच ती वाढते आहे. सर्वत्र अंगिकारली जाते आहे.
हे सर्व कारण असतांना आता आपण काय केले पाहिजे? ह्या सर्वांवर एक असा कुठलाच उपाय नाही. कारण हे खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे. त्यासाठी नेहमी दादागिरी व मारझोड करूनही फारसे काही हाती लागत नाही. मी काही विचार केलेल्या गोष्टी देत आहे. त्या सर्व हळूहळू आपण केल्यात तर नक्कीच फायदा होईल असे वाटते. तसेच वाचकांनी सुद्धा त्यांचे काही उपाय प्रतिक्रियांमध्ये नमूद केल्यास चांगले होईल.
१. मराठी बोलावे - हा एक अतिशय सोपा, सहज पण तेवढाच प्रभावी उपाय आहे. आपण सर्वांनी नेहमी, घरी-दारी, रस्त्यावर, दुकानात, कार्यालयात, विविध कॉल सेंटर वर, दूरदर्शन वाहिनीला मुलाखत देतांना जेथे होईल तिथे सर्व ठिकाणी मराठी बोलली पाहिजे. असे मानावे की आपल्याला हिंदी येताच नाही. केवळ मराठी व इंग्रजी हे पर्याय आहेत. इंग्रजी बोलले तरी चालेल पण हिंदी टाळावे. पुढचा माणूस मराठी नसला तरीही थोडा थोडा मराठी बोला, म्हणजे तो हळू हळू मराठी शिकेल.
त्यामुळे सर्व ठिकाणी मराठीचा प्रभाव पडेल व सर्व लोकांना कळून चुकेल की इथे मराठीला पर्याय नाही... इथे राहायचे म्हणजे मराठी यायलाच पाहिजे. एवढे केले तरी आपल्याला कोण भय्याला मारायची किंवा आंदोलन करण्याची गरज पडणार नाही.
हे मी मागील एका वर्षापासून करतो आहे.. व मला वाटले तेवढे हे कठीण नव्हते. मी तर मुंबई मध्ये सुद्धा दुकानदारांशी मराठी बोललो... पण त्यांना ते समजायचे.... मला वाटले तेवढे हे अवघड नव्हतेच.
२. मराठी लोकांना, मित्रांना, दुकानदारांना वाहिन्यांना प्राधान्य द्या - ह्यासाठी कुठेही गाजावाजा करण्याची गरज नाही. केवळ आपण कुठल्याही कामात (अगदीच देशविरोधी जात असेल तर मात्र नको, तेवढी खात्री मात्र केली पाहिजे :) मराठी लोकांना प्राधान्य द्या. म्हणजे मराठी दुकानदार असेल तर थोडा दूर असला तरी त्याच्याकडे जा. त्याला सांगा की तो मराठी आहे म्हणून मी त्याच्याकडे दुरून येतो. मराठी हॉटेल मध्ये जा, मराठी कामगार ठेवा (जेवढे होईल तेवढे), मराठी वाहिन्या पहा व मुख्य म्हणजे मुलांना मराठी सिनेमे व टीवी वरील कार्यक्रम दाखवा. मराठी पुस्तके द्या.
ह्याचे कारण म्हणजे - मराठी लोकांचा व्यवसाय वाढावा हे आवश्यक आहे. नाहीतर अमराठी दुकानदाराच्या दुकानावर मराठी पाट्या दिसण्यासाठी आपल्याला नेहमी मारामारी व आंदोलनेच करावे लागतील.
दुसरे कारण म्हणजे - सध्या मराठी लोक हे नक्कीच व्यवसायात व इतर क्षेत्रात थोडे मागे आहेत. मागच्या काही वर्षांत हे चित्र थोड्या प्रमाणात बदलते आहे व ती चांगली साईन आहे. मग मराठी लोकांना आणखी समोर आणण्यासाठी त्यांना थोडा आधार द्यावाच लागेल. म्हणजे आता जर माझ्या एरिया मध्ये ४ अमराठी माणसांची व १ मराठी माणसाचे दुकाने असतील तर मग त्याला खरोखर आपली गरज आहे. मराठी माणसे ग्राहकांशी चांगले बोलत नाहीत, दुकाने लवकर उघडत नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण तरीही आपण त्याला प्राधान्य दिले पाहिजे. ह्याचे कारण तो १ दुकानदार जर डूबला तर मराठी दुकानदारांचा टक्का शून्यावर येईल व मग परत उठणे खूपच कठीण होईल. जोपर्यंत त्याला स्पर्धा करणारा दुसरा मराठी दुकानदार येत नाही तोपर्यंत तरी त्याच्या ह्या उण्या दुन्याकडे थोडे दुर्लक्ष केलेच पाहिजे. जसे आपल्या देशाने आधी आयातीवर बंधने आणून, मुक्त व्यापार टाळून भारतीय उद्योगांना थोडी चालना दिली व जेंव्हा हे उद्योग एका म्याचूरिटी पर्यंत पोहोचले, तेंव्हा ही दारे उघडली... हे पण तसेच होईल. .. ह्यासाठी सुद्धा कुठलाही अनावश्यक गाजावाजा करण्याची गरज नाही.
३. विविध माध्यमांशी, बँकेशी, कॉल सेंटरशी मराठीचा आग्रह धारा. हा थोडा पुढचा टप्पा आहे. म्हणजे विविध बँकेशी किंवा कॉल सेंटरशी बोलतांना बिनधास्त मराठीचा आग्रह धरा. पण ओरडू नका. त्यांना बिनधास्त पणे सांगा की मला हिंदी येत नाही. मराठी किंवा इंग्रजीच येते. आणखी पुढचा टप्पा म्हणजे विविध मोठे उद्योग, सुपर मार्केट मध्ये मराठी बोर्डांचा आग्रह करा. तसेच विविध प्रोदाक्त्स वरील विवरणात मराठीचा आग्रह धरा. म्हणजे पुण्यात, नागपुरात, औरंगाबाद मध्ये, कोल्हापुरात, मुंबईमध्ये, अकोल्यात, नांदेडमध्ये ह्या सर्व ठिकाणी विकल्या जाणाऱ्या पैक्ड गोष्टीवर मराठीचा आग्रह धरा. जसे - आयसीआयसीआय बँकेचा "खयाल आपका" ऐवजी "काळजी तुमची / "विचार तुमचा" ह्याचा आग्रह धरला पाहिजे. हे जरी खूप पुढची स्टेप असली तरीही लक्षात असू द्या.
४. कोणाच्याही मराठीच्या बोलण्यावर हसू नका किंवा त्याच्या बोलण्याची टिंगल टवाळी करू नका. त्याला मराठी बोलतांना त्याचा सन्मान असू द्या. म्हणजे तो हिंदी कडे जाणार नाही.
५. मराठी चित्रपट पहा व मुलांना दाखवा. मराठी गाणी ऐका व ऐकावा. मराठी गाण्याची सीडी विकत घ्या. आजकाल कितीतरी चांगले मराठी चित्रपट येत आहेत. कितीतरी मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळताहेत, चांगली मराठी गाणी आहेत. ते आपण बघितले पाहिजेत, ऐकली पाहिजेत. व मुख्य म्हणजे मुलांना ऐकवली पाहिजेत.
तसेच रेडीओ च्यानल्स वर मराठी गीन्तांचा आग्रह धरला पाहिजे. आजकाल एवढी चांगली गाणी असतांना पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरांत एकही मराठी गाण्याचे रेडीओ च्यानल नाही! उलट कुठलाही फक्त मराठी गीतांचा तास नाही. पुणे, औरंगाबाद, नांदेड, अकोला, जळगाव, नागपूर (तसे मुंबई सोडून सर्व) ठिकाणी मराठी लोक जास्त असतांना रेडीओ वर हिंदी मिश्रित मराठी बोलतात व हिंदी गाणे ऐकवतात ! सध्या तरी मराठी रेडीओ वाहिनी येईपर्यंत आपण सर्वांनी मराठी गाण्याचा आग्रह धरला पाहिजे. फोने करून फार्मायीश केली पाहिजे.
हे सर्व विवेचन काही लोकांना पटणार नाही. पण माझे हे प्रामाणिक विचार आहेत. त्यात कुठल्याही इतर भाषिकांना त्रास देण्याचा विचार नाही. आपण फक्त महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरतो आहोत, दिल्ली किंवा युपी मध्ये नाही.. म्हणून मला तरी यात काही चूक वाटत नाही. पण तुम्ही ह्याच्यावर आणखी विचार करा. आणखी उपाय शोधा, मित्रांशी बोला. तुम्हाला वाटले तर इथे प्रतिक्रिया नक्की द्या.
आभार,
अकोलकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा