मित्रांनो,
मी मागच्या आठवड्यात अकोल्यात जाउन आलो, शिवाय मनोरा, बर्शिताकली पुसद, माहूर हा भाग फिरून आलो. तेंव्हा मला प्रकर्षाने जाणवलेले काही प्रश्न आहेत जे मी इथे मांडतो आहे. ह्यावर मी खूप दिवसांपासून विचार करत होतो व ह्यावर काय उपाय करता येतील हे शोधन होतो. ते उपाय मला सापडले असे म्हणू शकत नाही पण तरीही थोडे बहुत मी जे विचार केले, ते इथे देत आहे. हे उपाय आपल्याला लावून धरावे लागतील व त्यांची मागणी विविध माध्यमांतून करावी लागेल - जसे वृत्तपत्र, टीवि, राजकीय नेते आणि मंत्र्यांना पत्रे, ई .
काही प्रश्न:
१. खारपान पट्टा : अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील जवळ जवळ ८ तालुके ह्यापासून प्रभावित आहेत मुर्तीजापूर, अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापुर, संग्रामपूर, शेगाव, खामगाव इ. तालुक्यांत जमिनीत खारे पाणी लागते. हे अतिशय जड असते व पिण्यास अयोग्य असते. ह्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होऊ शकत नाही. तसेच हे असे क्षारयुक्त किडनीचे आजार बळावतात. अकोट, तेल्हारा, बाळापुर, शेगाव व संग्रामपूर तालुक्यांत हा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपाचा असून परिसरातील कितीतरी गरीब शेतकऱ्यांच्या घरातील कमावते लोक किडनीच्या आजाराने व्याधीत आहेत . त्यांच्यावर उपचारासाठी अकोल्याशिवाय पर्याय नाही व खाजगी दवाखान्यातील डायल्यासीससाठी पैसे नाहीत.
ह्यासाठी खारपानपट्टा विकास महान्मंडळ स्थापन करणे व योग्य वैद्यकीय उपाय करणे आवश्यक आहे.
२. अकोला शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रश्नांना काहीच उत्तर मिळत नाहीये. भर दिवसा टोळी युद्ध, सशस्त्र हाणामारी होते आहे. जुने शहर, अकोट फायील, खदान ह्या परिसरात हा प्रश्न जास्त गंभीर आहे. तसेच वाढत्या शहरातील वाढत्या गर्दीला वाहतुकीच्या नियमांची काहीच पर्वा नाही.
ह्या सर्वांवर उपाय म्हणून अकोला शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन करणे खूप जरुरीचे बनले आहे. ह्या बाबतीतला प्रस्ताव पाठविलेला आहे, पण सरकार कडून मंजुरी मिळाली नाही अजून.
३. अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ळ्यांचा परिसर हा सदोदित कमी पावसाचा राहिला आहे. मुर्तीजापूर, अकोला, बाळापुर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर ह्या पट्ट्यात तर अतिशय कमी पाऊस पडतो. त्यात खारपान पट्टा म्हणजे आणखीनच पाण्याची चणचण. शिवाय ह्या परिसरात एकही मोठी नदी नाही.
ह्या परिसराच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय शाशानाने करावी. त्यासाठी गरज असेल तर दुसरीकडून पाणी आणावे .
ह्याबाबतीत परिसराच्या विकासासाठी खालील उपाय आहेत आणि तुम्हाला योग्य वाटल्यास त्याबाबतीत सरकार दरबारी पाठपुरावा करावा ही विनंती.
काही उपाय:
१. अकोला इथे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील ८-१० तालुक्यांसाठी 'खारपानपट्टा विकास महामंडळ' स्थापन करून त्यायोगे जड / क्षारयुक्त पाणि शेतीसाठी उपयोगी आणि पिण्यायोग्य बनविण्याच्या उपायांची अंमलबजावणी करावी.
२. डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने खारपान पट्ट्यातील समस्यांच्या संशोधनासाठी पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजुरीसाठी प्रयत्न करावे ही विनंती.
३. अकोला इथे सध्या जिल्हा रुग्णालय अस्तित्वात नाही. पूर्वीचे रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालात परावर्तीत झाले आहे. सोबतच्या लातूर, कोल्हापूर इथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाल्यानंतर, वेगळे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आले पण केवळ अकोल्यात ते करण्यात आले नाही. अकोल्यात ते लवकरात लवकर स्थापन करावे. अकोल्यात ते अकोटरोड / उमरी / वाशीमरोड वर स्थापन करता येईल.
४. अकोला व लगतच्या परिसरासाठी लवकरात लवकर पोलिस आयुक्तालय स्थापन करून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था आणावी. अकोला व लागताच परिसर आता खूप वाढला असून त्यासाठी अकोला पोलिस आयुक्तालय स्थापन करणे आता आवश्यक आहे
५. अकोला शहराची वाढ आता भरपूर झाली असून ते उमरी, गुडधी, डबकी, गायगाव, खरप, रिधोरा, बाभूळगाव, शिवानी , शिवर, चांदूर, खडकी ही गावे अकोला महापालिकेत समाविष्ट करवित.
६. अकोला महापालिकेची आर्थिक स्तिथी अतिशय वाईट आहे. लातूर, नांदेड ह्यासारख्या सोबतच्या महापालिकांना कुठल्यातरी माध्यमांतून राज्य सरकारने भरपूर आर्थिक मदत केली . अकोला महापालिकेला सुद्धा राज्य सरकारने विशेष आर्थिक मदत करावी .
७. अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ळ्यांसाठी स्वतंत्र शिक्षण विभागीय बोर्ड द्यावे .
८. अकोला आणि खामगाव इथे काही मोठे उद्योग आहेत. उद्योग धंद्याची वाढ ह्या परिसराच्या विकासासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी अकोला इथे विभागीय MIDC कार्यालय द्यावे .
९. जालना - अकोला किंवा जालना - बाळापुर हा रेल्वे मार्ग झाल्यास २ फायदे होतिल. मराठवाडा मुंबई-कलकत्ता रेल्वे मार्गशी जोडले जाइल. दुसरे म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्राला एकत्र होणारा मार्ग हा होइल.
१०. पूर्णा - अकोला हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे. पुढे अकोला-खांडवा मार्ग अजूनही नारोगेज आहे. तो ब्रॉडगेज झाल्यास मद्रास, हैदराबाद ला जयपूर/दिल्ली सोबत जोडणारा सर्वांत जलद मार्ग उपलब्ध होइल.
११. अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ळ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटविण्यासाठी उर्ध्व वर्धा किंवा येलदरी प्रकल्पातून ह्या जिल्ळ्यांना पाणि द्यावे .
१२. खारपान पट्ट्यातील समस्या लक्षात घेऊन येथील धरणासाठी चे धोरण थोडे शिथिल करावे . कारण इथे धारण बांधण्यासाठी जास्त पैसे लागतात. पण येथील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता धरण करणे आवश्यक असून त्यासाठीचे धोरण शिथिल करावे . नेरधामणा, घुन्गाशी, आणि निम्न मोर्णा ह्या प्रकल्पांना लवकरात लवकर मान्यता देऊन ती पूर्ण करावीत.
ही व अशीच आणखी धोरणे आखून व ती प्रत्याक्ष्यात आणल्यास ह्या परिसराचा विकास शक्य आहे. हे उपाय लवकरात लवकर प्रत्यक्षात आणावे ही सरकारला विनंती .
मित्रांनो, तुम्हाला इतरही काही उपाय सुचवावेसे वाटल्यास तुम्ही जरूर प्रतिक्रिया लिहाव्यात .
आपला मित्र ,
अकोलकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा